महायुतीत पुणे शिक्षक मतदारसंघावरून घोडं अडलं, एकाच जागेवर तिन्ही पक्षांचा दावा
विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघावर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील तिन्ही पक्षांनी दावा केल्याने जागावाटपाचा पेच निर्माण झाला आहे.

पुणे : विधान परिषदेच्या आगामी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जागावाटपावरून महायुतीत मोठा पेच निर्माण झाला आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी या जागेची मागणी केली असून एका जागेसाठी पुन्हा वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. पुणे आणि नागपूर पदवीधर भाजपकडे, संभाजीनगर राष्ट्रवादी काँग्रेसकडे, तर अमरावती शिक्षक मतदारसंघ शिवसेना लढवणार असल्याचे समजते.
पुणे पदवीधरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसनेच लढवावी, अशी मागणी पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सुनेत्रा पवार यांची जिजाई निवासस्थानी भेट घेऊन केली. माजी आमदार सुनील टिंगरे, आमदार चेतन तुपे, निलेश निकम, दिपक मानकर आणि सुभाष जगताप यांनी ही विनंती केली. महायुतीच्या बैठकीत याबाबत बोलणार असल्याचे आश्वासन सुनेत्रा पवार यांनी दिले.
दुसरीकडे काँग्रेसने आपल्या तीन उमेदवारांची यादी परस्पर जाहीर केल्याने महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये नाराजी आहे. आज (शनिवार, ३ ऑक्टोबर) दुपारी २ वाजता हयात हॉटेल येथे महाविकास आघाडीची दुसरी बैठक होणार आहे.
विधान परिषदेच्या ५ जागांसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर आहे. २३ ऑक्टोबर रोजी मतदान आणि २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
