पुणेकरांना किती मिळणार पाणी? महापालिकेची २१.३४ टीएमसीची मागणी; जलसंपदाच्या निर्णयाकडे लक्ष
पुणे महापालिकेने २०२६-२७ या जलवर्षासाठी २१.३४ टीएमसी पाण्याची मागणी केली असून राज्यातील पाणीटंचाई व १० टक्के पाणीकपातीच्या आदेशांमुळे जलसंपदा विभाग किती पाणी मंजूर करतो याकडे लक्ष लागले आहे.
पुणे : राज्यातील पाणीटंचाई, धरणांमधील मर्यादित साठा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेले १० टक्के पाणीकपातीचे आदेश यामुळे पुढील जलवर्षात पुणे शहराला किती पाणी मिळणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. महापालिकेने १९ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे पाटबंधारे मंडळाकडे वार्षिक पाणी अंदाजपत्रक सादर करून २१.३४ टीएमसी पाण्याची मागणी केली.
अंदाजपत्रकात ७९ लाख ३१ हजार ५९१ लोकसंख्या गृहीत धरली असून पाच टक्के तरंगती लोकसंख्या धरून एकूण ८३ लाख २८ हजार १७१ लोकसंख्येचा विचार केला आहे. ३० टक्के पाणीगळतीही गृहीत धरली आहे. गेल्या वर्षी २१.०३ टीएमसीची मागणी असताना प्रत्यक्षात १४.८१ टीएमसीच मंजूर झाले होते.
नव्याने समाविष्ट गावांपैकी धायरी, नांदेड, उरुळी देवाची, फुरसुंगी, मांजरी आदी भागांत सरासरी १३५ लिटर प्रतिव्यक्ती प्रतिदिन पाणी मिळते, तर लोहगावमध्ये हा पुरवठा १०५ लिटर आहे. शहराचा सध्याचा दैनंदिन पाणीवापर सुमारे १६८० एमएलडी आहे.
मुळशी धरणातून घरगुती वापरासाठी अतिरिक्त पाच टीएमसी पाणी आरक्षणाच्या मागणीला अद्याप मान्यता मिळालेली नाही.
