विनर्स अकादमीच्या मिळकतीवर आळंदी नगरपरिषदेची कारवाई; अकादमी सील
दिवेआगर येथे सहलीला गेलेल्या आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर, व्यवसाय परवाना नसल्याने आळंदी नगरपरिषदेने विनर्स अकादमी कोचिंग क्लासची मिळकत सील केली.

आळंदी : दिवेआगर येथे आळंदीहून सहलीसाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आळंदी नगरपरिषदेमार्फत शहरातील कोचिंग क्लासेस व आस्थापनांची पाहणी सुरू आहे. पाहणीत विनर्स अकादमी कोचिंग क्लासेससाठी आवश्यक व्यवसाय परवाना किंवा ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्याचे नगरपरिषदेच्या अभिलेखात आढळले नाही.
मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या आदेशानुसार कर विभाग प्रमुख सीमा चारवे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पोलिसांच्या उपस्थितीत ही मिळकत सील केली. आस्थापनांनी आवश्यक परवानग्या व नियमांचे पालन करावे, असे नगरपरिषदेने स्पष्ट केले.
