अप्पूघरात सर्रास वृक्षतोड? प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रमोद कुटे आक्रमक
निगडी प्राधिकरणातील अप्पूघर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचे समोर आले असून परवानगी कोणी दिली, याची चौकशी करण्याची मागणी नगरसेवक प्रमोद कुटे यांनी केली आहे.
पिंपरी : निगडी प्राधिकरणातील अप्पूघर परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात असल्याने पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे. वृक्षतोडीस परवानगी कोणी दिली आणि नियमांचे पालन झाले का, असा सवाल उपस्थित होत आहे.
महापालिका प्रशासन आणि वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करावी, परवानगी नसल्यास कठोर कारवाई करून वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद कुटे यांनी केली. दुर्गा टेकडी परिसरातील झाडे तोडली जात असतील तर विकासाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल सहन केली जाणार नाही, असे ते म्हणाले.
