'सेवा माझे योगदान' अभियानाला पुणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, १३ तालुक्यांत २४ हजार ७२४ नागरिकांचा सहभाग
जिल्हा परिषद पुणेच्या 'सेवा माझे योगदान' उपक्रमात ३० सप्टेंबरअखेर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये २४ हजार ७२४ नागरिकांनी सहभाग नोंदवला असून ९ हजार ९५६ लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे.
पुणे : जिल्हा परिषद, पुणे यांच्या वतीने 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत राबवण्यात येत असलेल्या 'सेवा माझे योगदान' कार्यक्रमाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर आणि १ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, कंपोस्टिंग, योग व ध्यान असे उपक्रम राबवले जात आहेत.
हवेली तालुक्यात सर्वाधिक २ हजार ५३६ नागरिकांनी सहभाग नोंदवला, त्यानंतर शिरूरमध्ये २ हजार ३३० आणि खेडमध्ये २ हजार २५२ नागरिक सहभागी झाले. नागरिकांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेने केले आहे.
