कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत आपत्कालीन परिस्थितीचा संयुक्त सराव यशस्वी
दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत विविध शासकीय यंत्रणांच्या समन्वयाने आपत्कालीन परिस्थितीचा संयुक्त सराव यशस्वीरित्या पार पडला.

पुणे : पुणे : संभाव्य औद्योगिक आपत्कालीन परिस्थितीत विविध औद्योगिक आस्थापना, शासकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, वैद्यकीय पथक आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील समन्वय, तत्परता व आपत्कालीन प्रतिसादाची कार्यक्षमता तपासण्यासाठी कुरकुंभ, ता. दौंड, औद्योगिक वसाहतीमध्ये आज संयुक्त आपत्कालीन सराव यशस्वीरित्या पार पडला. सहसंचालक श्री. सुधीर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सरावामध्ये अमोनिया वायूची वाहतूक करणाऱ्या टँकरमधून अमोनिया वायूची गळती होऊन गुडलक चौक परिसरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याचे काल्पनिक दृश्य तयार करण्यात आले.
या परिस्थितीला अनुसरून बचावकार्य, प्रथमोपचार, जखमींचे स्थलांतर, अग्निशमन, वाहतूक नियंत्रण, परिसर सुरक्षित करणे तसेच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचा प्रत्यक्ष सराव करण्यात आला. सरावामध्ये चार जखमींची काल्पनिक परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. सहभागी पथकांनी निर्धारित वेळेत घटनास्थळी पोहोचून श्वसन संरक्षण संच, सुरक्षा पथक, प्रथमोपचार पथक, अग्निशमन पथक, रुग्णवाहिका आणि वाहतूक नियंत्रण यंत्रणेचा प्रभावी वापर करत नियोजित पद्धतीने कार्यवाही केली.
