पिंपरी-चिंचवडमध्ये ७ ऑक्टोबरपासून भव्य राष्ट्रीय पुस्तक मेळा; ५० हून अधिक प्रकाशकांचा सहभाग, हजारो पुस्तकांची मेजवानी
पिंपरी-चिंचवडमध्ये ७ ऑक्टोबरपासून भव्य राष्ट्रीय पुस्तक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यात ५० हून अधिक प्रकाशक सहभागी होणार आहेत.
पिंपरी : पिंपरी : वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी भारतीय विचार साधना फाउंडेशन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच भव्य राष्ट्रीय पुस्तक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (७ ऑक्टोबर) ते शनिवार (१० ऑक्टोबर) या कालावधीत निगडी प्राधिकरणातील सेक्टर २५ येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या परिसरात हा मेळा भरणार आहे.
या मेळ्यात ५० हून अधिक प्रकाशकांची हजारो पुस्तके उपलब्ध होणार आहेत. इतिहास, संस्कृती, सामाजिक व राष्ट्रीय विषय, विज्ञान, शेती, पर्यावरण, योग, आरोग्य, संतसाहित्य, अर्थकारण, समरसता, थोर व्यक्तींची चरित्रे, कुटुंब प्रबोधन तसेच बालसाहित्य अशा विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांसह सर्व वयोगटातील वाचकांना समृद्ध साहित्याची पर्वणी मिळणार आहे.
