रिक्षाची भाडेवाढ आली अंगावर! कारचा प्रवास पडतोय स्वस्त; पवरीत 'या' गणिताने चालक चक्रावले
पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षा भाडेवाढीनंतर प्रवाशांनी कार प्रवासाला पसंती दिल्याने रिक्षाचालक अडचणीत आले आहेत.

पिंपरी : पिंपरी : रिक्षाचा प्रवास महाग आणि त्याच मार्गावर एसी कारचा प्रवास स्वस्त, असे अजब चित्र सध्या खाजगी ॲग्रिगेटर ॲपवर दिसत आहे. रिक्षाच्या मीटर दरात झालेल्या भाडेवाढीनंतर ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या ॲपवर रिक्षाचे भाडे वाढले. मात्र, कारच्या भाड्याच्या तुलनेत फारशी वाढ झाली नाही. त्यामुळे अनेक मार्गांवर रिक्षापेक्षा कारचे भाडे ५० ते १०० रुपयांनी कमी दिसत आहे.
परिणामी, प्रवासी रिक्षाऐवजी आरामदायी आणि वातानुकूलित कारला पसंती देत आहेत. या बदलाचा थेट परिणाम शहरातील रिक्षाचालकांच्या व्यवसायावर झाला आहे. सीएनजीचे वाढते दर, महागलेले स्पेअर पार्ट्स आणि देखभालीचा वाढता खर्च लक्षात घेऊन रिक्षा संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) ९ सप्टेंबरपासून रिक्षाच्या मीटर दरात वाढ केली.
