किमान ७० किलोमीटर मेट्रो मार्गिकांच्या पूर्णत्वातून २०२७ हे 'मेट्रो वर्ष' ठरावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई आणि परिसरात किमान ७० किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका पूर्ण करून २०२७ हे 'मेट्रो वर्ष' ठरवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

मुंबई : मुंबई : २०२७ हे 'मेट्रो वर्ष' ठरवून यंदाच्या प्रलंबित कामांसह पुढील वर्षी किमान ७० किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका पूर्ण कराव्यात. डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणाऱ्या ३६ किलोमीटर मेट्रो मार्गिकांची व्याप्ती ५० किलोमीटरपर्यंत नेण्यासाठी कामांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
पायाभूत सुविधांची कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रकल्पांवरील किमान ५० टक्के काम यांत्रिकीकरणावर आधारित असावे. कौशल्याधारित कामगारांची उपलब्धता निश्चित करून मजुरांच्या तुटवड्यावर यांत्रिकीकरणातून उपाय शोधावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी स्थापन मुख्यमंत्री वॉर रूमच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. बैठकीस नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या. मेट्रो मार्गिका २-ब मधील डी. एन. नगर ते चेंबूर मार्गावरील जुहू सर्कलजवळील गर्दीचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार रविवारी १२ तासांच्या विशेष रस्ता ब्लॉकचे नियोजन करावे. कामाची सद्यस्थिती बघून पुढील रस्ता ब्लॉकचा निर्णय घ्यावा. या कामामुळे नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, याची दक्षता घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
