स्वच्छतेतून निरोगी आरोग्य, वृक्षारोपणातून हरित भविष्य !
पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत आरोग्य संस्थांच्या परिसरात स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येत आहे.

पुणे : पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत आरोग्य संस्थांच्या परिसरात स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. स्वच्छ परिसर, निरोगी नागरिक आणि हरित पर्यावरण या त्रिसूत्रीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांना अधिक स्वच्छ बनवण्यावर भर दिला जात आहे.
आरोग्य आणि स्वच्छता यांचा अतूट संबंध असून, कचऱ्याच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे विविध आजारांना पोषक वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत स्वच्छता अभियानाला प्राधान्य देण्यात येत आहे. आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेविका आणि स्थानिक पातळीवरील संबंधित घटकांच्या सहभागातून हा उपक्रम राबवला जात आहे.
स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून ती आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाली पाहिजे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी केले आहे. प्रत्येक नागरिकाने स्वच्छता राखण्यासोबतच लावलेल्या वृक्षांचे संगोपन करून स्वच्छ गाव-निरोगी गाव बनवण्यासाठी योगदान द्यावे, असे त्यांनी म्हटले आहे.
