वाकडच्या अंडरपासमध्ये टेम्पो कॉलमला धडकला; टपावर बसलेल्या तरुणाचा मृत्यू
वाकड येथील अंडरपासमध्ये टेम्पो कॉलमला धडकल्याने टपावर बसलेल्या धनंजय कुदळे या २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
पिंपरी : वाकड येथील अंडरपासमध्ये भरधाव टेम्पो कॉलमला धडकल्याने टपावर बसलेल्या धनंजय श्रीनिवास कुदळे (वय २०, रा. महादेव कॉलनी, थेरगाव) या तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. टेम्पोचालक तुषार ज्योतीराम माने याच्याविरुद्ध वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे टेम्पो चालवत होता. अंडरपासमधून जाताना टपावर बसलेल्या धनंजयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.
