‘पार्टिसिपेट मुंबई’तून जनसहभागाला नवी दिशा मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईच्या विकासात लोकसहभाग वाढवण्यासाठी 'पार्टिसिपेट मुंबई' या नवीन डिजिटल मंचाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

मुंबई : मुंबईच्या विकासात लोकसहभाग वाढवण्यासाठी 'पार्टिसिपेट मुंबई' या नवीन डिजिटल मंचाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. हा मंच केवळ सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधी उभारण्याचा नसून, शासन, पालिका आणि नागरिक यांना एकत्र आणणारा आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, या मंचाच्या माध्यमातून मुंबईतील कुपोषण, बालकांमधील खुंटलेली वाढ आणि गरीब वस्त्यांमधील मुलांपर्यंत पोषण पोहोचवण्यासाठी सीएसआर भागीदारीचा प्रभावी वापर केला जाईल. यामुळे प्रशासकीय प्रक्रियेत पारदर्शकता आणि गतिशीलता येईल.
या उपक्रमामुळे मुंबईकरांना त्यांच्या प्रभागातील नागरी सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यांसारख्या विषयांवर थेट सहभाग नोंदवता येणार आहे. पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले की, हा मंच मुंबईला अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख बनवण्यासाठी उपयुक्त ठरेल.
