स्वच्छतेच्या दुर्गे सांभाळताहेत संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराच्या स्वच्छतेची धुरा
पिंपरी चिंचवड शहराच्या स्वच्छता व्यवस्थेत महिला आरोग्य निरीक्षक आणि मुकादम महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

पिंपरी : पिंपरी: शहर स्वच्छ ठेवण्यासाठी रस्ते, सार्वजनिक ठिकाणी आणि परिसराची नियमित स्वच्छता होणे आवश्यक असते. ही स्वच्छता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सफाई सेवकांचे नियोजन, कामगार देखरेख आणि विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील महिला आरोग्य निरीक्षक, आरोग्य मुकादम या सांभाळत आहेत. स्नेहल सोनवणे, संतोष कदम, स्नेहा चांदणे, स्नेहल सुकते, कोमल फडडे, रश्मी तुंडलवार, रूपाली साळवे, महिला आरोग्य मुकादम प्रमिला शिंदे, शिवगंगा नागरगोझे, रुक्मिणी बिनवडे शहराच्या स्वच्छता व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
शहरातील विविध भागातील स्वच्छता कामांचे नियोजन करणे, सफाई कर्मचाऱ्यांशी समन्वय साधणे आणि कामाकाजावर लक्ष ठेवणे, अशा जबाबदाऱ्या त्या पार पाडतात. स्वच्छताविषयक उपक्रम प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, यासाठी त्यांना सातत्याने प्रयत्न करावे लागतात. दैनंदिन कामातून शहरातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्यास त्यांचे योगदान मिळत आहे.
स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने शहरातील स्वच्छतेचा दर्जा उंचावणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवणे याला महत्त्व आहे. या कामात महिला आरोग्य निरीक्षक, आरोग्य मुकादम, सफाई सेवकांच्या मदतीने विविध स्वच्छता उपक्रम राबवतात. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्यासाठी प्रयत्न करणे, यावर भर दिला जातो. 'माझी वसुंधरा' अभियानालाही सहकार्य केले जाते.
