बंद पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू करा, टँकरचा पर्याय शेवटी वापरा : चंद्रशेखर बावनकुळे
राज्यातील दुष्काळी तालुक्यांत प्रलंबित वीजबील व ट्रान्सफॉर्मरअभावी बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू करण्याचे निर्देश मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

मुंबई : मुंबई : राज्यातील काही दुष्काळी तालुक्यांत प्रलंबित वीजबीलांमुळे किंवा ट्रान्सफॉर्मरअभावी बंद असलेली पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू कराव्यात. जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हानिहाय उपाययोजनांचे प्रस्ताव येत्या १५ दिवसांत मागवून ते मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्याची कार्यवाही करावी. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर हा शेवटचा पर्याय ठेवून त्यापूर्वी अन्य सर्व उपाययोजना पडताळत यावेत, असे निर्देश महसूल मंत्री तथा दुष्काळसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे दुष्काळसंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मंत्री बावनकुळे यांनी विविध विभागांच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. प्रलंबित वीजबिलांसाठी संबंधित जिल्ह्यांनी पंधराव्या वित्त आयोगातून उपलब्ध होणारा निधी वापरावा. अन्य जिल्ह्यांना एकाकरमी तडजोड योजनेच्या माध्यमातून प्रलंबित वीजबिले भरण्याची कार्यवाही करण्यासाठी निर्देश द्यावेत. ज्याठिकाणी ट्रान्सफॉर्मरअभावी पाणीपुरवठा योजना बंद आहेत, तिथे ऊर्जा विभागाने ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून द्यावेत. यापूर्वी कार्यान्वित असलेल्या योजनांचा वीजपुरवठा पूर्ववत करून त्या पुन्हा सुरू करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर होण्यापूर्वी पाणीचांदीवर मात करण्यासाठी पाणी उपलब्ध असलेल्या विहिरी अधिग्रहित कराव्यात. ७५ ते ८० टक्के काम पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण कराव्यात. नादुरुस्त हातपंपानी तात्काळ दुरुस्ती करावी आणि पाणी स्रोत मजबूत करण्यावर भर द्यावा. शिवाय पाण्याचे टँकर सुरू करण्यापूर्वी पाणीपुरवठा योग्य आणि सुरक्षित होण्यासाठी टँकर ऐपे आणि जीपीएस प्रणाली सुरू करावी. मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन त्यांना यासंदर्भात मार्गदर्शन करावे, असेही मंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले.
