केंद्राच्या कृषि योजनांतर्गत शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ; अर्ज करण्याचे आवाहन
केंद्र शासनाच्या विविध कृषी योजनांतर्गत शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
पुणे : पुणे : केंद्र शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येणार विविध योजनांतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना विविध कृषि घटकांसाठी अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी केले. राष्ट्रीय कृषि विकास योजना - सूक्ष्म सिंचन, राष्ट्रीय कृषि विकास योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना या योजनांमध्ये समावेश आहे.
राष्ट्रीय कृषि विकास योजना - सूक्ष्म सिंचन योजने अंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संचासाठी अल्प व अत्यल्प भूधारक लाभार्थ्यांना ८० टक्के, तर बहुभूधारक लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदान देण्यात येते. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना ९० टक्के अनुदानाची तरतूद आहे. सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळ्यांसाठी आकारमानानुसार १४ हजार रुपयांपासून ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते.
शेतकऱ्यांनी अर्ज सादर करताना सर्व माहिती अचूक भरावी. त्यामुळे अर्ज मंजूर होण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल. अर्ज करताना आधार संलग्न बँक खाते तपशीलासह आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. शेतकऱ्यांनी https://mhadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज करावा. अर्ज सादर करताना 'प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर अर्जाचा विचार केला जातो. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे अर्ज सादर करावेत. अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण येत असल्यास त्यांनी आपल्या परिसरातील सामूहिक सेवा केंद्र अथवा संबंधित कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
