देशाला आणि राज्याला दर्जेदार अधिकारी देणारे अधिकाऱ्यांचे गाव तहानलेले; पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, गावकरी हळहळले!
अनेक आयएएस, आयपीएस व डीएसपी अधिकारी देणारे सोलापूर जिल्ह्यातील उपळाई बुद्रुक हे गाव सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहे. ३०५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला असून गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.
मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक हे गाव अनेक दर्जेदार अधिकारी देणारे गाव म्हणून ओळखले जाते. या गावातून २० हून अधिक फौजदार, ५० हून अधिक पोलीस कर्मचारी, शिक्षक आणि सैनिकी सेवेतील लोक घडले आहेत. मात्र, सध्या हे गाव तीव्र पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने होरपळत आहे.
राज्यात यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला असून उपळाई बुद्रुकमधील ओढे-नाले सुकले आहेत. शेतातील पिके करपून गेली असून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना दूरवर वणवण करावी लागत आहे.
