ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली
बृहन्मुंबई महानगरपालिकेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला अटी-शर्तींसह शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा आयोजित करण्याची अधिकृत परवानगी दिली आहे. या परवानगीसाठी पालिकेने ५०० रुपये अधिक १८% जीएसटी व २० हजार रुपयांची अनामत रक्कम निश्चित केली आहे.
मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने पक्षाला दसरा मेळाव्यासाठी अधिकृत परवानगी दिली आहे. खा. अनिल देसाई यांनी केलेल्या अर्जावर पालिकेच्या जी-उत्तर विभागाने ही परवानगी दिली.
पालिकेच्या पत्रानुसार २० ऑक्टोबर रोजी मुख्य दसरा मेळाव्यासाठी आणि १९ ऑक्टोबर रोजी पूर्वतयारीसाठी अशा दोन दिवसांची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी पालिकेने २४ कठोर अटी-शर्ती घातल्या असून प्रतिदिन ५०० रुपये अधिक १८ टक्के जीएसटी परवाना शुल्क आणि २० हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
हायकोर्टाच्या आदेशानुसार रात्री १० नंतर कोणताही कार्यक्रम घेता येणार नाही, तसेच ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळावे लागतील.
