भेसळखोरीला सुरुंग
भारतातील खाद्यपदार्थांमधील वाढती भेसळ ही नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारी गंभीर बाब बनली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात हाती घेतलेली विशेष मोहीम आणि कडक कारवाई स्वागतार्ह पाऊल आहे.
जगभरातील आहारपद्धतींपेक्षा भारतातील पदार्थ स्वादिष्ट आणि रुचकर ठरण्याचे एक कारण म्हणजे त्यात होणारा मसाल्यांचा वापर. मात्र, गेल्या काही वर्षांत मसाल्यांमध्ये आणि अन्नपदार्थांत मोठ्या प्रमाणावर भेसळ करून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार समोर येत आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील मसाला उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांसाठी सर्वसमावेशक नियमावली जारी करून कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. भेसळयुक्त पनीर, मावा, तूप, बनावट औषधे आणि प्रतिबंधित गुटखा याविरोधात कडक मोहीम उघडली आहे.
नागरिकांना शुद्ध अन्न आणि खात्रीशीर औषधे उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. एफएसएसएआय कायद्यांतर्गत अन्नपदार्थांचे प्रमाणीकरण आणि दर्जा तपासणी अधिक कडक करून भेसळखोरांना अद्दल घडवणे आवश्यक आहे.
