सेवा रस्त्याच्या कामावरून वडगाव बुद्रुक ग्रामस्थ आक्रमक; आंदोलनाचा इशारा; सनसिटी ते रघुनंदन हॉलदरम्यानच्या रस्त्याच्या उंचीवर आक्षेप
सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथील सनसिटी ते रघुनंदन हॉलदरम्यान सेवा रस्त्याची उंची अवाजवी वाढवल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. प्रशासनाने कामाचा फेरआढावा न घेतल्यास मनोज डांगत यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पुणे : पुण्यातील वडगाव बुद्रुक येथील सनसिटी ते रघुनंदन हॉलदरम्यान राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या सेवा रस्त्याच्या कामावरून स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. रस्त्याच्या अवाजवी उंचीमुळे स्थानिक रहिवाशी, शाळकरी मुले आणि वाहनचालकांना भविष्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
स्थानिक रहिवाशी व ग्रामस्थ मनोज शंकर डांगत यांनी रस्त्याच्या कामाचा फेरआढावा घेण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या समस्येचे लवकरात लवकर निवारण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी महापालिका व रस्ते प्रशासनाला दिला आहे.
रस्त्याच्या नियोजनात त्रुटी राहिल्यास भविष्यात वाहतूक कोंडी व अपघातांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे महापालिका आणि संबंधित विभागांनी संयुक्त पाहणी करून जोडरस्ते आणि उंचीचे योग्य नियोजन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
