विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा :विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले; पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेबाबत प्रशिक्षण संपन्न
पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी अचूक व पारदर्शक पार पाडण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोपवलेली जबाबदारी दक्षतेने पार पाडावी, असे निर्देश विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी बालेवाडी येथील प्रशिक्षण वर्गात दिले.

पुणे : पुणे विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेचे प्रशिक्षण बालेवाडी येथे पार पडले. विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी मतमोजणी प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले.
या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी व निवडणूक उपनिर्णायक संजय पलांडे, महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक अरुण आनंदकर यांच्यासह विभागातील अधिकारी उपस्थित होते. मतमोजणीच्या दिवशी कोणतीही संदिग्धता राहू नये म्हणून सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रक्रियेचा सराव करून देण्यात आला.
२६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या मतमोजणीत मतपेट्या उघडणे, ५० मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करणे आणि पसंतीक्रमानुसार मोजणी करणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
