विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान
महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद, पुणे व नागपूर पदवीधर तसेच अमरावती व पुणे शिक्षक मतदारसंघातील ५ जागांसाठी शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.
मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद, पुणे व नागपूर विभागातील तीन पदवीधर तसेच अमरावती व पुणे विभागातील दोन शिक्षक अशा एकूण ५ जागांसाठी शुक्रवारी, २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान पार पडणार आहे.
या निवडणुकीसाठी एकूण ५ मतदारसंघांत १८२ उमेदवार रिंगणात आहेत. १० लाख ६८ हजार ९२ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून २,४१९ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या ५ सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी पूर्ण होत आहे.
