पुण्यात गुरुवारचा पाणीपुरवठा बंद नको! शिवसेनेची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पुण्यात दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याऐवजी दररोजच्या पाणीपुरवठ्यात १ तास कपात करून नियमित पाणी द्यावे, अशी मागणी शिवसेनेने महापालिका आयुक्तांकडे केली.
पुणे : पुणे शहरात दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या महापालिकेच्या निर्णयावर नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दर गुरुवारी पाणी बंद असल्याने शुक्रवारी अनेक भागांत कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यामुळे शिवसेनेच्या (ठाकरे) वतीने पालिका आयुक्तांकडे हा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
पाणी कपातीऐवजी दररोजच्या पाणीपुरवठ्याच्या वेळेत १ तास कपात करून दररोज नियमित पाणी द्यावे, तसेच जलवाहिन्यांमधील गळती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
