दिवाळीत पुणे-नागपूरचे तिकीट पाच हजारांवर, खाजगी बसचे दर दुप्पट, प्रवाशांची लूट
दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढल्याचा फायदा घेत खासगी बसचालकांनी तिकीट दरात प्रचंड वाढ केली असून पुणे-नागपूर प्रवासभाडे पाच हजारांवर गेले आहे.
पुणे : दिवाळी सणासाठी मूळ गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे खासगी बस वाहतूकदारांनी तिकिटांचे दर प्रचंड वाढवले आहेत. नियमित दिवसांच्या तुलनेत तिकीट दर दुप्पट ते तिप्पट झाले असून पुणे-नागपूर मार्गावर एका सीटसाठी पाच ते साडेसहा हजार रुपये मोजावे लागत आहेत.
एसटी महामंडळाच्या गाड्या आणि रेल्वेचे आरक्षण पूर्ण झाल्याने प्रवाशांना नाईलाजाने खासगी बसेसचा आसरा घ्यावा लागत आहे. नियमबाह्य तिकीट दरवाढीवर आरटीओकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे.
