पुण्यात फटाक्यांच्या आतषबाजीवर निर्बंध; न्यायालयाने दिले आदेश, नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई
मुंबई उच्च न्यायालय व एमपीसीबीच्या आदेशानुसार पुण्यात दिवाळीत रात्री १० ते सकाळी ६ वाजेदरम्यान फटाके फोडण्यावर बंदी व शांतता क्षेत्रांमध्ये कडक निर्बंध लादले आहेत.
पुणे : दिवाळी आणि इतर सण-उत्सवांमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीमुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार पुण्यात रात्री १० ते सकाळी ६ वाजेदरम्यान फटाके फोडण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालये यांच्या १०० मीटर परिसरात फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे. याशिवाय लेझर लाईट आणि उच्च तीव्रतेच्या ध्वनी उपकरणांवरही बंदी घालण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
