हिंजवडीत मुळा नदीच्या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त; पाण्याच्या दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर
हिंजवडी, मान आणि मारुंजी परिसरात मुळा नदीत प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडल्याने प्रचंड प्रदूषण झाले असून नदीतील मासे मृत पावले आहेत.

हिंजवडी : आयटी नगरी म्हणून ओळख असलेल्या हिंजवडी परिसरातील मुळा नदीचे पात्र अत्यंत प्रदूषित झाले असून पाण्याचा दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिक व कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रक्रियांशिवाय थेट सोडले जाणारे सांडपाणी आणि मैल्यामुळे नदीतील शेकडो मासे मृत पावले आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जलसंपदा विभागाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मुळशी धरणातून स्वच्छ पाणी नदीपात्रात सोडावे आणि दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी सरपंच विक्रम साखरे यांनी केली आहे.
