१२ किलो गांजासह पुणे पोलिसांचा कॉन्स्टेबल तेलंगणात अटक
पुणे पोलीस दलातील वाहतूक कॉन्स्टेबल नितीन शिंदे याला १२ किलो गांजासह तेलंगणात अटक करण्यात आली असून त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
पुणे : पुणे शहर पोलीस दलाच्या वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलला तेलंगणा पोलिसांनी १२ किलो गांजासह अटक केली आहे. नितीन ज्ञानु शिंदे असे आरोपी कर्मचाऱ्याचे नाव असून तो विश्रामबाग वाहतूक विभागात तैनात होता.
तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील नेक्कोंडा परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या शिंदे याच्याकडून १२ किलो गांजा जप्त करण्यात आला. या घटनेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शिंदे याला तात्काळ निलंबित केले असून बडतर्फीची कारवाई सुरू केली आहे.
