पुण्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली, महापालिकेची मोफत तपासणीची घोषणा
पुण्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २,२०० च्या पार गेल्याने महापालिकेने सर्व दवाखान्यांमध्ये मोफत डेंग्यू तपासणी व उपचार सुविधेची घोषणा केली आहे.

पुणे : पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने महापालिकेचे आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. चालू वर्षात २० ऑक्टोबरपर्यंत डेंग्यूच्या २,२९१ रुग्णांची नोंद झाली असून रुग्णांसाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत तपासणी व उपचारांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
महापालिकेच्या आरोग्य पथकांनी शहरातील १४ लाख घरांना भेट देऊन २८ लाख साठवणूक कंटेनरची तपासणी केली. यात १३ हजार घरांमध्ये डासांच्या अळ्या सापडल्याने २,६६४ मिळकतदारांना नोटिसा देऊन ६ लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
