अर्णब चक्रीवादळाचा हाहाकार,आंध्र प्रदेश-ओडिशामध्ये मुसळधार पाऊस, शाळा बंद अन् हाय अलर्ट
अर्णब चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीवर धडकल्याने आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला असून शाळा बंद ठेवून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ओडिशा : अर्णब चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीवर धडकल्यामुळे ओडिशा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांनी खबरदारीचे उपाय अधिक तीव्र केले आहेत. चक्रीवादळ जमिनीवर धडकण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही या भागात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे सुरू राहण्याची शक्यता आहे. दोन्ही पूर्व किनारी राज्यांनी शाळा बंद ठेवल्या आहेत, समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घातली आहे, बचाव पथकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले असून सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अर्णब चक्रीवादळ बुधवारी पहाटे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ स्थिर होते आणि लँडफॉलची प्रक्रिया पुढील दोन ते तीन तास सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या तीव्र चक्रीवादळात १३५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असून, वाऱ्याचा वेग ताशी १५० किमीपर्यंत पोहोचत आहे. यामुळे अनाकापल्ली, विशाखापट्टणम, काकिनाडा आणि कोनासीमा या जिल्ह्यांसह अनेक भागांना मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा तडाखा बसला आहे.
काकिनाडा येथे पोलिसांनी अडकलेल्या लोकांची सुटका केली, तर मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मदतकार्याचा आढावा घेतला. राज्य सरकारने ६०९ शाळांचे पुनर्वसन केंद्रांमध्ये रूपांतर केले असून, बुधवारी पहाटेपर्यंत ८५४ लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. तसेच झारखंडच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
