पुणे महापालिकेच्या मिळकतकरासाठी 'सेल्फ असेसमेंट'ची का होते मागणी ?
पुणे महापालिकेच्या मिळकतकर आकारणीत पारदर्शकता आणण्यासाठी आणि नागरिकांचे हेलपाटे वाचवण्यासाठी 'सेल्फ असेसमेंट' प्रणाली सुरू करण्याची मागणी निलेश निकम यांनी केली आहे.

पुणे : पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच नवीन मिळकतींचा कर आकारणीची प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी नागरिकांना स्वतःहून मिळकतकराचे मूल्यांकन करता येईल, अशी स्वतंत्र ('सेल्फ असेसमेंट') संगणक प्रणाली विकसित करावी, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनी केली आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे नवीन मिळकतींची कर आकारणी जलद होण्यासोबतच नागरिकांना महापालिकेच्या कार्यालयात वारंवार हेलपाटे मारण्याचा त्रास कमी होईल, असा विश्वास निकम यांनी व्यक्त केला. शहरात दर वर्षी मोठ्या संख्येने नवीन मिळकतींची भर पडते. मात्र त्या तुलनेत मिळकतकराची आकारणी करण्यासाठी महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने नागरिकांना अर्ज केल्यानंतरही अनेक महिने थांबावे लागते.
पुणे महापालिकेने २००७-०८ मध्ये सर्वसाधारण सभेत वार्षिक करपात्र रक्कम निश्चित करण्याबाबत धोरण तयार केले. त्यानुसार मिळकतची वाजवी भाडे निश्चित करण्याची तरतूद करण्यात आली. मात्र, गेल्या अनेक वर्षांत नवीन मिळकतींची करपात्र रक्कम निश्चित करताना केवळ किरकोळ वाढ केली जात असल्याचे निकम यांनी म्हटले आहे. त्यामुळे मिळकतदाराने नोंदवलेली माहिती योग्य आहे की नाही, याची खातरजमा करणे शक्य होईल, असे निकम यांनी सांगितले.
