विरोधी पक्षनेत्यांच्या इशार्यानंतर कारवाई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील दूषित पाणी आणि अस्वच्छतेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या निलेश निकम यांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने दुरुस्तीचे काम सुरू केले.
पुणे : घोले रस्त्यावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील दूषित पाणीपुरवठा आणि अस्वच्छतेच्या समस्यांबाबत विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनी पाहणी करून प्रशासनाला दोन दिवसांत उपाययोजना करण्याचा इशारा दिला. त्यानंतर वसतिगृहात तातडीने दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली.
वसतिगृहात गेल्या काही महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा आणि अस्वच्छतेच्या तक्रारी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. निकम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. यासंदर्भात निकम यांनी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन दिवटे यांनी दिले. दोन दिवसांत उपाययोजना न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्याचा इशारा निकम यांनी दिला.
या वसतिगृहाची क्षमता सुमारे ४०० विद्यार्थ्यांची असताना, गेल्या चार वर्षांपासून येथे सरासरी १२० विद्यार्थी राहत असल्याचा मुद्दाही निकम यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांना प्रवेश, निवास आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच एक हजार विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे नवीन वसतिगृह उभारण्याची मागणीही त्यांनी केली.
