महात्मा जोतीराव फुले महसूल लोकअदालत अभियान,महसुली दावे व अपील तडजोडीने निकाली काढण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत राबविण्यात येणार अभियान
महसूल न्यायालये व कार्यालयांमधील प्रलंबित दावे तडजोडीने निकाली काढण्यासाठी 'महात्मा जोतीराव फुले महसूल लोकअदालत अभियान' ३१ मार्च २०२७ पर्यंत राबवले जाईल.
पुणे : महसूल विभागातील प्रलंबित अर्धन्यायायिक प्रकरणे संबंधित पक्षकारांच्या परस्पर संमतीने व तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी राज्यभर 'महात्मा जोतीराव फुले महसूल लोकअदालत अभियान' राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. हे अभियान १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
महसूल व वन विभागाने १३ ऑगस्ट २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच अप्पर जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायायिक न्यायालयांमध्ये जमिनीशी संबंधित विविध प्रकारचे महसुली दावे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असतात. या प्रकरणांचा निपटारा होण्यास विलंब झाल्याने संबंधित पक्षकारांचा वेळ आणि पैसा खर्च होतो.
या पार्श्वभूमीवर, विधि सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या लोकअदालतीच्या धर्तीवर दोन्ही पक्षकारांच्या संमतीने महसुली दावे कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या या अभियानाचा उद्देश आहे. पुणे जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या महसूल लोकअदालतीच्या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन हा उपक्रम राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
