दुष्काळग्रस्तांसाठी आमदार शंकर जगताप यांचा मदतीचा हात..!
चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत ११ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

पिंपरी : पावसाने अचानक दांडी मारल्याने निर्माण झालेली दुष्काळ परिस्थिती, शेतीचे नुकसान आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी चिंचवड डेव्हलपर्स अँड बिल्डर्सच्या वतीने विजुशेठ जगताप आणि चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि संकटाच्या काळात त्यांना आधार मिळावा, या उद्देशाने जगताप यांच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे ११ लाख रुपयांची मदत सुपूर्द करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या मदतीचा धनादेश देण्यात आला.
शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसाठी दुष्काळ हा केवळ पाण्याचा प्रश्न राहत नाही, तर तो त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बनतो. पिकांची हानी, घटते उत्पन्न आणि वाढत्या आर्थिक अडचणींमुळे शेतकरी कुटुंबांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मदतीचा हात देण्याची गरज असते.
याच सामाजिक जाणिवेतून आमदार जगताप यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचे योगदान दिले. शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी सक्षम असेल, तर ग्रामीण अर्थव्यवस्थाही बळ मिळते. त्यामुळे संकटाच्या काळात शेतकऱ्यांना केवळ सहानुभूती न दाखवता प्रत्यक्ष मदत मिळणे महत्त्वाचे आहे. दुष्काळग्रस्तांना मदत पोहोचविण्याच्या प्रयत्नांना हातभार लागावा, या हेतूने ही रक्कम देण्यात आली आहे. चिंचवड शहरातील अनेक होतकरू कुटुंबांना शैक्षणिक, आरोग्यविषयक कारणांसाठी आर्थिक मदत केली आहे.
