'बिग बॉस'फेम अभिजित बिचुकलेंना मोठा धक्का! मिळाली फक्त इतकी मत
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उभे राहिलेल्या 'बिग बॉस'फेम अभिजित बिचुकले यांना अवघी १९ मते मिळाली आहेत.
पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. शिवसेनेचे मंगेश चिवटे यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर पक्षाने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा जाहीर केला. आता निवडणूक पार पडल्यानंतर सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. कालपासून सुरू असलेली मतमोजणी अद्याप सुरू असून, उपलब्ध आकडेवारीनुसार भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे आघाडीवर आहेत. तर अपक्ष उमेदवार सचिन सानप दुसऱ्या स्थानावर आहेत.
आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे अभिजित बिचुकले यांनीही पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, या निवडणुकीत त्यांना अवघी १९ मते मिळाली आहेत. शिक्षक आणि पदवीधर अशा दोन्ही मतदारसंघांत निवडणूक लढवणाऱ्या बिचुकले यांना मतदारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसत आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयासाठी २५ हजार ७५६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांना १७ हजार ६०० मते मिळाली असून ते आघाडीवर आहेत. तर अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना ११ हजार ३२८ मते मिळाली आहेत. ते दुसऱ्या स्थानावर आहेत.
