आजचा ई-पेपर

पुण्याचे सायं दैनिक RNI No. MAHMAR/2023/89884

ताज्या बातम्या

आजच्या अंकाचे पहिले पान

आजचा अंक, छापील पानासारखा

प्रत्येक पान मूळ मांडणीत वाचा, झूम करा, पूर्ण स्क्रीनवर पाहा किंवा PDF डाउनलोड करा.

ई-पेपर वाचा

बातमीपत्र

    राष्ट्ररूप विचार

    पुणे

    पिंपरी-चिंचवडमध्ये डेंग्यूच्या डंखात वाढ, ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक रुग्ण

    पिंपरी-चिंचवड शहरात ऑक्टोबर महिन्यात ९० जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून एकूण रुग्णसंख्या २१२ वर पोहोचली आहे.

    राष्ट्ररूप प्रतिनिधी · २८ ऑक्टोबर २०२६

    पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत ९० जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता २१२ वर गेली. मलेरियाचे ४१ रुग्ण आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत डेंग्यूच्या एक हजार ७२६ संशयित रुग्णांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ९० जणांचे अहवाल सकारात्मक आले. यंदा जानेवारीपासून २५ ऑक्टोबरपर्यंत डेंग्यूचे २१२ रुग्ण आढळले आहेत.

    पिंपरी, चिंचवड, वाकड, थेरगाव, पिंपळे सौदागर, मोशी आणि चिखली या भागात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळले. या परिसरात गृहप्रकल्पांची बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढल्याचे निरीक्षण वैद्यकीय विभागाने नोंदविले. सध्या हवामानात मोठा बदल होत आहे. दिवसा कडक ऊन आणि सकाळी-संध्याकाळी थंड वातावरण, असे विषम हवामान आहे. अशा हवामानामुळे सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

    डेंग्यूच्या अळ्या स्वच्छ पाण्यात तयार होतात. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरात किंवा परिसरात स्वच्छ पाण्याची डबकी तयार होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे आणि उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी जनजागृती व खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. परिसरात पाणी साचू न देणे आणि वैयक्तिक स्वच्छता पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.