मुलींच्या जन्माचे स्वागत घरातूनच व्हावे' ; आईसोबत वडील आणि कुटुंबाचेही समुपदेशन करा : डॉ. नीलम गोऱ्हे
मुलींचे घटते जन्मप्रमाण रोखण्यासाठी आईसोबतच वडील आणि संपूर्ण कुटुंबाचे समुपदेशन करावे, असे निर्देश विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

पुणे : दोन मुली असलेल्या कुटुंबांमध्ये केवळ आईचे समुपदेशन करून चालणार नाही. वडील आणि कुटुंबातील इतर सदस्यांचेही समुपदेशन करून मुलगा-मुलगी समानतेची जाणीव निर्माण करावी. मुलासाठी महिलांवर येणारा दबाव दूर करण्यासाठी संपूर्ण कुटुंबाची मानसिकता बदलण्यावर भर द्यावा, अशा सूचना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.
प्रसूतीपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदा व वैद्यकीय गर्भपात कायद्यांविषयीच्या राज्यस्तरीय टास्क फोर्सच्या अध्यक्षा तसेच ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भाशय शस्त्रक्रियाविषयक समितीच्या अध्यक्षा या नात्याने डॉ. गोऱ्हे यांनी आज पुणे येथे आढावा बैठक घेतली. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भाग, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कायद्याची अंमलबजावणी, न्यायालयीन प्रकरणे आणि ऊसतोड महिलांच्या आरोग्याचा आढावा यावेळी घेण्यात आला.
यावेळी आमदार उमा खापरे, डॉ. संदीप सांगळे, डॉ. भगवान पवार तसेच संबंधित आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते. जिल्हा स्तर २०२५ मध्ये दर हजार नोंदणीकृत मुलांमागे मुलींचे प्रमाण ८९५ होते. दि. १ जानेवारी ते २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीतील नोंदणीनुसार हे प्रमाण ८८२ असून ग्रामीण भागात ८४४ आणि शहरी भागात ८८८ आहे. या आकडेवारीत विलंबाने झालेल्या जन्मनोंदणीचाही समावेश असल्याचे सादरीकरणात नमूद करण्यात आले. या स्थितीची तालुकानिहाय कारणे तपासून उपाययोजना कराव्यात. आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कुटुंबांशी संवाद वाढवावा आणि जन्मजागृतीचे उपक्रम राबवावेत, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
