सीबीएसई राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत उंड्रीच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश
तेलंगणा येथे आयोजित सीबीएसई राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत उंड्री येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तीन सुवर्ण व एका कांस्यपदकासह यश संपादन केले.

पुणे : पुणे : तेलंगणा राज्यातील नचाराम येथे आयोजित 'सीबीएसई राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा २०२६' मध्ये ध्रुव ग्लोबल स्कूल (उंड्री) येथील युवा नेमबाजांनी अप्रतिम कामगिरी करत तीन सुवर्ण आणि एका कांस्यपदकावर आपले नाव कोरले. या दिमाखदार यशासह कार्तिकी पाटील हिची आगामी 'एसजीएफआय' राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
वैयक्तिक प्रकारात कार्तिकी पाटील हिने उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत कांस्यपदक पटकावले, तर ईवा मोदी हिने राष्ट्रीय स्तरावर सहावा क्रमांक मिळवत छाप पाडली. सांघिक प्रकारात कार्तिकी पाटील, ईवा मोदी आणि ऋत्वी धनावत या तिघांच्या संघाने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
खेळाडूंची मेहनत, सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि प्रशिक्षक उज्ज्वला मडम यांचे उत्तम मार्गदर्शन यामुळे हे यश शक्य झाल्याचे सांगण्यात आले. या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, संचालक यशोवर्धन मालपाणी व प्राचार्य शारदा राव यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
