फराळ, मिठाईत भेसळ केल्यास खैर नाही; तुकाराम मुंढेंचा व्यापाऱ्यांना थेट इशारा
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोर व्यापाऱ्यांना कडक कारवाईचा थेट इशारा दिला आहे.

मुंबई : दिवाळीच्या सणात बाजारात मिठाई, फराळ, फरसाण आणि खाद्यपदार्थांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असताना, नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कडक कारवाईची मोहीम उघडली आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत प्रत्यक्ष कारवाईची घोषणा केल्याने व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
सणासुदीच्या काळात मुदत संपलेले, निकृष्ट दर्जाचे व घातक रसायने वापरलेले खाद्यपदार्थ बाजारात आणले जातात. यावर रोख लावण्यासाठी एफडीएने केवळ इशारा न देता प्रत्यक्ष कारवाई सुरू केली आहे. राज्यभरातील १,०५७ मसाला आस्थापनांवर धाडी टाकून १४ आस्थापनांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
तसेच विविध कारखाने व गोदामांवर छापे टाकून ११,९६३ क्विंटल भेसळयुक्त माल जप्त केला असून त्याची किंमत ११.६९ कोटी रुपये आहे. दिवाळी संपेपर्यंत एफडीएची ही धडक मोहीम अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.
