उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ६ जणांचा मृत्यू
बद्रीनाथ धाम येथून डेहराडूनला परतणारे हेलिकॉप्टर जोशीमठजवळ कोसळून पायलटसह सहा जणांचा मृत्यू झाला.

नवी दिल्ली : बद्रीनाथ धाम येथून डेहराडूनला परतणारे हेलिकॉप्टर शुक्रवारी जोशीमठजवळ कोसळले. या दुर्घटनेत पायलटसह हेलिकॉप्टरमधील सहा जणांचा मृत्यू झाला. सर्व मृतदेह बचाव पथकांना सापडले आहेत. दुर्गम भागात हा अपघात झाल्याने मृतदेह रस्त्यापर्यंत आणण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
ट्रान्स भारत एव्हिएशन कंपनीचे हे हेलिकॉप्टर बद्रीनाथ येथून डेहराडूनच्या दिशेने उड्डाण केले होते. उड्डाणानंतर १५ मिनिटांनी संपर्क तुटला. दुर्घटनेत पायलट हिमांशू यांच्यासह प्रतापा, अरुण साळुंके, शंकरगौडा व्ही. जी., सुधीर के. आणि एच. एस. नागराजा यांचा मृत्यू झाला. सर्व प्रवासी बेंगळुरू येथील होते.
