बारामतीमध्ये विक्रमी पाऊस, एका रात्रीत रस्ते जलमय, नगरपालिकेच्या शाळांना सुट्टी जाहीर
बारामती शहरासह तालुक्यात एकाच रात्रीत १५८ मि.मी. असा विक्रमी मुसळधार पाऊस पडल्याने रस्ते जलमय झाले असून नगरपालिकेने सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
पुणे : राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बारामती, इंदापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी अचानक आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे.
बारामतीमध्ये अवघ्या अडीच ते तीन तासांच्या मुसळधार पावसाने शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली. सकाळी सात वाजेपर्यंत शहरात तब्बल १५८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले असून अनेक घरांमध्ये पाणी साचले आहे.
पावसाची तीव्रता आणि निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन बारामती नगरपालिकेच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या पावसामुळे दुष्काळी भागातील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी वाहतूक व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.
